बारामती प्रतिनिधी
बारामती शहरात लॉकडाउन होणार, अशा स्वरुपाच्या बातम्या पसरविल्या जात असून, अशा प्रकारे कोणतेही लॉकडाउन करण्याचा प्रशासनाचा सध्या तरी कोणताही विचार नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नव्याने लॉकडाउन होण्याची शक्यता असल्याचे काही मॅसेज समाजमाध्यमांवर फिरत आहे, त्या शिवाय फोनवरूनही अनेक लोक चौकशी करत आहेत. या पार्श्वभूमीवर दादासाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॉकडाउनची शक्यता फेटाळून लावली.
रुग्ण संख्या वाढू लागल्याने पुन्हा बारामतीत लॉकडाउन होईल किंवा दुकानांच्या वेळा अजून कमी केल्या जातील, अशा स्वरुपाची चर्चा बारामतीच्या व्यापारपेठेत सुरु आहे. दादासाहेब कांबळे यांनी मात्र असे लॉकडाउन करण्याचा सध्या तरी कोणताही विचार नाही किंवा दुकानांच्या वेळातही सध्या तरी काही बदल केला जाईल, अशी शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.



