नारळाच्या शेतात साठलेले पावसाचे पाणी
सुपे प्रतिनिधी सुदाम नेवसे
बारामती तालुक्यातील सुपे व परिसरातील गावांमध्ये काल दि.(१९) रोजी दोन टप्प्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातल्याने ओढ्या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून ताली फुटल्या आहेत. आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास पहिला पाऊस सुरु झाला आणि तो अडीच वाजता थांबला पुन्हा साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसास सुरुवात झाली आणि पाच वाजून वीस मिनिटाने पाऊस बंद झाला या दोन टप्प्यातील मुसळधार पावसाने सुपे गावाच्या मध्यभागी असणाऱ्या ओढ्याला पूर आला होता तर माळआळीवरून येणारे पाणी सावतामहाराज मंदिरालगतच्या अनेक घरांमध्ये घुसल्याने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. उशिरा पेरणी केलेल्या बाजरीची कणसे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी टाकलेली कांद्याची रोपे सडण्याची शक्यता असून आगाप पेरलेल्या व लावलेल्या कांद्याची रोपे पिवळी पडून रोग पडण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजी व कोथिंबीर, टोमॅटो या तरकारी पिकांचेही नुकसान झाले आहे. सुपे व परिसरातील नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी ,बाबुर्डी, वढाणे, काळखैरेवाडी, राजबाग, पानसरेवाडी या भागांमध्ये सर्वदूर पाऊस झाला आहे. या भागामध्ये गेल्या महिन्यापासून सतत पाऊस होत असून यामुळे शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने बाजरी ,मका या पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये अनेकांची ऊस पिके आडवी पडून नुकसान झाले आहे. सुपे तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन तो तुडुंब भरला आहे.
सुपे गावाच्या तलावात मोठ्या प्रमाणात पाणी येऊन तुडुंब भरला आहे
पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसून ताली फुटल्या आहेत. छायाचित्रे- सुदाम नेवसे सुपे.
******************************************
हा महिना धोंड्याचा असून मोठा पाऊस लागला तर ओला दुष्काळ पडण्याची शक्यता अनेक जुन्या जाणकार वयोवृद्ध व्यक्तींनी व्यक्त केली आहे.



