Type Here to Get Search Results !

भाजपाच्या बॉलिवूड ड्रग कनेक्शन चौकशीची पुर्नमागणी

प्रतिनिधी मिलन शाह मुंबई.

अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणांनी चौकशी करुनही काहीच निष्पन्न झाले नाही. एनसीबीची चौकशीसुद्धा जनतेची दिशाभूल करण्याकरता केली गेली आणि ती फार्सच ठरली. या प्रकरणात भाजपाचा ड्रग अँगल आला होता आणि मोदींच्या बायोपीक निर्मात्यांचे नावही चर्चेत आले होते म्हणून बॉलीवूड व भाजपा ड्रग कनेक्शनची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने ३१ ऑगस्ट २०२० रोजी केली होती त्या मागणीचा पुनरुच्चार करण्यासाठी आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व रत्नाकर सिंह हेही होते.यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, हे ड्रग कनेक्शनचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे असे गृहमंत्री यांनी म्हटले असून विवेक ओबेरॉयचे भाजपाशी घनिष्ठ संबंध आहेत, ते भाजपाचे स्टार प्रचारक राहिले आहेत. या अगोदर या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारर्फे राष्ट्रीय तपास यंत्रणांना विनंती करण्यात आली होती, परंतु या तपास यंत्रणांवर मोठा दबाव असल्याचे दिसते, तरीदेखील पुन्हा एनसीबीकडे या मागणीचा पुनरुच्चार केला जाईल आणि त्यांनी चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस चौकशी करतील, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे, अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली. 

सावंत पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या बॉलिवूड ड्रग कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे हे राज्य सरकारतर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवले होते परंतु या माहिती अन्वये एनसीबीने अद्याप चौकशी केलेली नाही. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपीक निर्मात्याचे नाव येत होते. त्या निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील केली होती परंतु त्या दिशेने तपासच केला गेला नाही. राज्य सरकारने विनंती करुनही याचा तपास केला गेला नाही. या संदर्भात संदिप सिंह व विवेक ओबेरॉय यांचे नाव येत होते. ड्रग कनेक्शन संदर्भात बंगळूरु पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही हे आश्चर्याचे आहे. 

या सदंर्भात काही महत्वाचे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत राहिले आहेत. बॉलिवूडमध्ये इतके मोठे निर्माते असताना केवळ संदिप सिंह याच्याच कंपनीची निवड बायोपीकसाठी का केली? सदर बायोपीकच्या पोस्टर अनावरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला अमुल्य वेळ काढून गेले होते. सदर संदिप सिंहचा पार्टनर हा अभिनेता विवेक ओबेरॉय आहे. या दोघांनी मोदींचा बायोपीक काढला आहे तसेच मोदींची भूमिकाही विवेकनेच केली आहे. विवेक ओबेरॉय गुजरातमध्ये भाजपाचे स्टार प्रचारक होते. केवळ या दोघांच्या कंपनीलाच गुजरात सरकारने बोलवून वायब्रंट गुजरातमध्ये १७७ कोटी रुपयांचा करार केला होता. कर्नाटकमध्ये भाजपाच्या प्रचारात सामिल झालेली अभिनेत्री रागिनी व्दिवेदी ही सँडलवूड ड्रग रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तिच्याबरोबर १२ लोकांवर ड्रग पेडलींगचा गुन्हा दाखल केलेला आहे. या १२ लोकांमध्ये आदित्य अल्वा नावाचा व्यक्ती देखील असून तो अद्याप फरार आहे आणि आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे. ही सर्व माहिती चौकशीकरता दिली होती परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

बंगळूरु पोलीसांनी काल १५ ऑक्टोबरला अभिनेता विवेक ओबेरॉयच्या मुंबईतील घरी छापे मारले त्याच दिवशी लॉकडाऊन नंतर देशभरात जो पहिला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तो नरेंद्र मोदींचा बायोपीक होता. हा नियतीने ठरवलेला योगायोग आहे. महाराष्ट्र भाजपा कार्यालयात संदिपसिंहने ५३ वेळा कोणाला फोन केला याचे उत्तरही अजून मिळालेले नाही, असेही सावंत म्हणाले..✍🏻

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test