Type Here to Get Search Results !

शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिक पायाभूत सुविधांपासून वंचित...






बारामती प्रतिनिधी दिगंबर पडकर

एका बाजूला बारामतीचा सर्वांगीण विकास तर दुसर्‍या बाजूला नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातच नागरिकांना प्राथमिक सोयी-सुविधा नसल्याचा विरोधाभास शहरात पहावयास मिळत आहे.


 २०१३ मध्ये बारामती नगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली या हद्दवाढीत तांदळवाडी, रुई, जळोचीसह काही ग्रामीण भागाचा समावेश करण्यात आला. मात्र या वाढीव हद्दीत अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे चित्र आहे. 


हद्दवाढी वेळी शेंडेवस्ती, समर्थनगर हा भाग नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जोडण्यात आला आहे. मात्र याठिकाणी प्राथमिक सोयी सुविधांची मोठ्या प्रमाणात वानवा असल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. शेंडेवस्तीतील नागरिक अक्षरशः विविध समस्यांनी त्रस्त झाले आहे. या भागात रस्ता, पाणी, स्वच्छतेचा अभाव आहे. येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून पायी चालणे ही जिकरीचे झाले आहे. अगोदरच कच्चा रस्ता त्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांसह लहान मुलांना इजा झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. तसेच पावसाळ्यात नेहमीच वस्तीच्या चौ बाजूने ठीक ठिकाणी पाणी साचून राहते. सर्वत्र गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला पिण्याचे पाणी सुद्धा विकत आणून प्यावे लागत आहे या समस्यांबाबत आम्ही वेळोवेळी पालिका शासन- प्रशासनाला कळवले असताही दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील नागरिक सांगतात.


शेजारीच असणार्‍या समर्थ नगर भागातही नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी या भागात आठवड्यातून दोन वेळेस टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळी येथील नागरिकांना मोकाट कुत्री व डुकरामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील अंतर्गत रस्त्यावर चेंबर नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहेत. येथील काही चेंबर रस्त्यापासून फूटभर वर तर काही चेंबर रस्त्यापासून खोल आहेत. त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या चेंबरमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


...........................



सॅल्यूट मारून माजी सैनिकाची पालिकेला विनंती....


बारामती सारख्या शहरात नगरपालिकेकडून प्राथमिक सुख सोयी मिळत नाहीत यासाठी माजी सैनिकासह नागरिकांना वारंवार पालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही येथील समस्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे. मात्र पालिकेच्या कार्यक्षेत्रातील शेंडेवस्ती येथील समस्या अद्याप सुटू शकलेल्या नाहीत. येथील समस्या लवकर सुटाव्यात यासाठी माजी सैनिक अशोक जगताप यांनी सॅल्यूट मारून पालिका प्रशासनाला विनंती केली आहे..



...........................


दहा वर्षापासून नगरपालिकेकडे घर पट्ट्या भरतोय मात्र आम्हाला पालिकेकडून कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. येथील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याठिकाणी लाईटची सोय नाही.रस्ता नसल्याने संपर्कही तुटतोय.


भाऊ शेंडे- (शेंडेवस्ती, स्थानिक नागरिक. बारामती)



...........................



लवकरच येथील रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल. कोरोनामुळे सर्वच कामे ठप्प होती. मी स्वतः पाहणी करून येथील समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील.



पौर्णिमा तावरे- ( नगराध्यक्षा.बारामती नगरपालिका.)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test