बारामती प्रतिनिधी
राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत बारामती तालुक्यात लंपी व लाळ्या खुरकत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील अनेक गावातील ८ हजार १५३ जनावरांना आत्तापर्यंत लसीकरण देण्यात आले आहे. पैकी ७४ जनावरे आजारी आढळून आली. उपचारादरम्यान ६७ जनावरे बरी झाली असून ७ जनावरांवर अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी रमेश पाटील यांनी दिली.
लंपी हा त्वचा आजार मुख्यता गाई व म्हशींमध्ये होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. जनावरांच्या शरीरावर गाठ येणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. या त्वचा आजाराचा प्रादुर्भाव चावणाऱ्या माशा, डास, गोचीड तसेच इतर बाधित जनावरांच्या संपर्कात आल्याने व दूषित पाणी व चाऱ्यामुळे होतो. पशुपालकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्या जनावरांना लसीकरण करून घेणे गोठा व आसपासचा परिसर नियमित स्वच्छ व कोरडा ठेवणे माशा, डास, गोचीड याचा प्रादुर्भाव न होण्यासाठी निर्जंतुकीकरण करणे. बाधित जनावरांचे विलीनीकरण करणे. महत्वाचे आहे.
बारामती तालुक्यातील अंजनगांव, बऱ्हाणपूर, जळगाव सुपे, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, कारखेल, जराडवाडी, डोर्लेवाडी, गोजुबावी, धुमाळवाडी या गावात सध्या या आजाराची साथ चालू आहे. या भागात एकूण ५ हजार ३०० लसीकरण झाले आहे. ५८ जनावरांना लंपी या आजाराची लागण झाली होती. पैकी ५ जनावरे औषध उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत तर सहा जनावरांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
...........................................
गाई, बैल, म्हैस या जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळ्या खुरकत या आजाराची बारामती तालुक्यात ४५ हजार लसीकरण करण्यात आले आहे.
...........................................
अशी आहेत लक्षणे....
१) बाधित जनावरे साधारण दोन ते पाच आठवडे लंपी आधाराची बाह्य लक्षणे दाखवत नाहीत. याला रोगाचा सुप्त काळ म्हणतात.
२) जनावरास तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोळ्यातून व नाकातुन श्रव सुरू होतात.
३) जनावरांच्या शरीरावर गाठी येतात.
४) भूक, तहान मंदावते व दुग्ध उत्पादन कमी होते.
...........................................
आजारी व निरोगी जनावरे वेगवेगळी ठेवावी. त्यांना एकत्रित चारा पाणी देणे टाळावे. आजाराची लक्षणे दिसताच तात्काळ जनावरांना लसीकरण करून घ्यावे.
रमेश पाटील- (पशुसंवर्धन तालुका अधिकारी. बारामती)



