-इंदापूर तालुक्यात १२४७ मि.मी.पाऊस
इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यामध्ये वार्षिक सरासरीपेक्षा राज्यात सर्वाधिक असा 140 टक्के अधिकचा पाऊस झाल्याने शेतातील खरीप पिके, फळबागा, चारा पिके वाया गेली आहेत. तसेच वादळी पावसाने ऊस पिक जमिनीवर लोळल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीत तग धरून असलेली उभी पिके सध्या च्या संततधार पावसाने शेती जलमय झाल्याने पाण्यात आहेत . त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा देणेसाठी शासनाने इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे बुधवारी (दि.१४) पत्र पाठवून केली आहे .
इंदापूर तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी फक्त ५२५ मि.मी.एवढी आहे. आज अखेर (दि.१४) तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिकचा म्हणजे एकूण १२४७ मि.मी. विक्रमी पाऊस झाला आहे . आज (दि.१४ ऑक्टो.) हे पत्र लिहीत असतानाही सकाळ पासून पाऊस कोसळत आहे . वेधशाळेचा आणखी परतीच्या पावसाचा पाऊसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेली ४ महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे .
एका दिवसात ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी समजली जाते . चालु पावसाळ्यात इंदापूर तालुक्यात आठ ते नऊ वेळा अतिवृष्टी झाली आहे . या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी शेतजमिनीची माती वाहून जाऊन शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत . त्यामुळे आपत्तीग्रस्त शेतकरी वर्गाला व नागरीकांना दिलासा देणेसाठी शासनाने इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यक आहे , असे हर्षवर्धन पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे .
शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेली खरीप पिके, फळबागा , चारा पिके व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी . तसेच रब्बी व इतर पिके घेणेसाठी शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत करावी , अशी मागणी या पत्रात मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे .
तसेच इंदापूर तालुक्यात काही मंडलमध्ये पर्ज्यनमापक यंत्रे कार्यान्वित नाहीत . त्यामुळे अतिशय चुकीचे पावसाचे अंदाजे आकडे शासनाकडे पाठविले जात आहेत . बावडा येथे मोहिते पाटील साखर कारखान्याच्या पर्ज्यनमापक यंत्रावर आजअखेर पावसाची नोंद १२४७ मि.मी. झालली असताना शासनाकडे मात्र फक्त ६५३ मि.मी. एवढी चुकीची नोंद आहे . त्यामुळे शासनाने इंदापूर तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांकडील झालेल्या पावसाच्या नोदी ग्राह्य धरून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देऊ नये , असे पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले आहे .
इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना शासनाच्या ओल्या दुष्काळाच्या सवलती व आर्थिक मदतीची गरज आहे . त्याकरिता शासनाने तातडीने इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश द्यावेत , अशी विनंती या पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे .या पत्राच्या प्रति विभागीय आयुक्त पुणे , जिल्हाधिकारी पुणे , उपविभागीय अधिकारी बारामती , तहसीलदार इंदापूर व तालुका कृषी अधिकारी इंदापूर यांनाही देण्यात आल्या आहेत .