नीरा प्रतिनिधी
नीरा ( ता . पुरंदर ) येथील युवा लेखक सुनील प्रभाकर पांडे यांनी आधुनिक तंत्रस्नेही कल्पनेचा उपयोग करून इंद्रायणी एक्सप्रेस ही व्हाॕट्सअॕप माध्यमातून साकारलेली मराठी साहित्यातील पहिली व्हाॕट्सॲप महाकादंबरी लिहिली आहे . त्यांचा हा अभिनव उपक्रम साहित्य क्षेत्रात कौतुकाचा विषय झाला आहे .
युवा लेखक सुनील पांडे यांनी लिहिलेली इंद्रायणी एक्सप्रेस ही व्हॕट्सअॕप वरील कादंबरी तब्बल ५२० पानांची असून पुण्यातील स्नेहवर्धन प्रकाशनाच्या सुप्रसिद्ध प्रकाशिका डाॕ .स्नेहल तावरे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे . नुकतेच लेखक सुनील पांडे यांनी कुटूंबासमवेत पुस्तकाचा औपचारिक पद्धतीने प्रकाशन सोहळा पार पाडला .
इंद्रायणी एक्सप्रेस कादंबरी बद्दल बोलताना प्रकाशिका डाॕ . स्नेहल तावरे म्हणाल्या , "इंद्रायणी एक्सप्रेस ही महाकादंबरी सुनील पांडे यांच्या प्रगल्भतेची साक्ष देणारी आहे .एक हळूवार , मनाला रिझविणारी रमणीय प्रेमकथा व्हाॕट्सॲपच्या माध्यमातून युवालेखक सुनील पांडे यांनी अप्रतिम फुलवलेली आहे . व्हाॕट्सॲपवरील महाकादंबरी म्हणून भारतीय आणि जागतिक भाषेमध्ये इंद्रायणी एक्सप्रेस या महाकादंबरीला नक्कीच मानाचे स्थान मिळेल . कथा , कविता , कादंबरी , चरित्र , लेख या साहित्य प्रकारात युवालेखक सुनील पांडे यांनी मारलेली मजल कौतुकास्पद आहे. इंद्रायणी एक्सप्रेस या पहिल्याच महाकादंबरीच्या रूपाने त्यांनी टाकलेले दमदार पाऊल त्यांचा भविष्यकाळ उज्जल करणारा ठरेल असा मला विश्वास आहे. एक रोचक , उत्कंठावर्धक महाकादंबरी प्रत्येक रसिक वाचकांनी वाचली पाहिजे असेही तावरे म्हणाल्या.