बारामती प्रतिनिधी
शेती परवडत नाही,म्हणून नोकरी शोधत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांसमोर बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील एका उमद्या तरुणाने एक आदर्श उभा केला आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील एका २१ वर्षीय युवकाने एका एकरात १२१ टन उसाचे उत्पन्न मिळवले आहे. पहिल्याच प्रयत्नात शेती क्षेत्रात मोठे यश मिळवणाऱ्या युवा शेतकऱ्याचे अर्जुन मासाळ असे नाव आहे.
अर्जुन मासाळ यांना एकूण ७ एकर शेती आहे. त्यात त्यांनी द्राक्ष व उसाची लागवड केली आहे. मासाळ यांनी प्रथमच २६५ उसाची लागवड केली. यासाठी त्यांनी चार फूट ऊस बेणे लावले. तसेच मायक्रो न्यूट्रिशनचा वापर, योग्य पाणी व खत व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी उच्चांकी ऊस उत्पादनाची किमया साधली आहे. ऊस लागवडी नंतर त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून ऊसाला पाणी व खत दिले. सरासरी एका एकरात ४० ते ६० टन ऊस उत्पादन मिळते. मात्र मासाळ यांनी केलेल्या प्रयोगशील शेतीमुळे अनेक वर्षानंतर छत्रपती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी १२१ टन ऊस उत्पादन मिळवले आहे.या पिकाचा पोत पाहून पिकात असणारी कमतरता तसेच औषध व खतांची मात्रा योग्य प्रमाणात देण्याची समज त्यांनी आत्मसात केली. त्याचा परिणाम उच्चांकी उत्पन्न मिळण्यात झाला.
अर्जून मासाळ हा युवा शेतकरी बारामतीतील एका नामांकित महाविद्यालयात बीएच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेतोय. त्याला मुळातच शेती क्षेत्राची आवड आहे.
शेतीतून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बदलून नवीन संशोधन शेती पद्धतीची माहिती करून घ्यावी व त्या पद्धतीने शेती करावी. झिरो बजेट शेती केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो. इतर उद्योगांना पेक्षा शेतीला कमी भांडवल लागते. त्याचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा असे या युवा शेतकऱ्याने सांगितले.