मोरगाव प्रतिनिधी
आयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी मोरया गोसावी यांच्या चिंचवड देवस्थान ट्रस्ट मार्फत आज एकवीस लाख रुपयांचा धनादेश श्री गोविंददेव गिरी महाराज यांकडे देण्यात आला . देणगी स्विकारताना स्वामी म्हणाले की , देवस्थान मार्फत मिळालेली ही देणगी म्हणजे गणेशाचा प्रसाद असुन मंदिर उभारण्यासाठी मोरयाचे ही कृपा आशीर्वाद आहेत .
आज चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने आयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे विश्वस्त स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांकडे एकवीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला . यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव , विश्वस्त विश्राम देव , आनंद तांबे , राजेंद्र उमाप विनोद पवार उपस्थित होते. आयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी तीनशे -चारशे कोटी रुपये तर ईतर विकास कामांसाठी अकराशे कोटी रुपये खर्च येणार असुन यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे . मुख्य मंदिराचे काम तीन ते साडेतीन वर्षात पुर्ण होणार आहे .यामुळे मंदिर उभारणीस आर्थिक मदत देण्या संदर्भात चिंचवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत २१ लाख रुपये देण्याचे सर्वानुमते ठरवले होते .
यानुसार आपली सामाजिक बांधीलकी या नात्याने आज श्री गोविंददेव गिरी महाराज यांच्या पुणे येथील आश्रमात जाऊन धनादेश देण्यात आला .तसेच मंदिर उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आर्थिक मदत संकलन करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे स्वामी गोविंददेव गिरी यांचा सत्कार मंदार देव यांसह विश्राम देव , आनंद तांबे , राजेंद्र उमाप , विनोद पवार या विश्वस्तांनी शाल व मोरया गोसावी यांचा फोटो देऊन केला . या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी विश्वस्त मंडळाच्या झालेल्या चर्चेप्रसंगी स्वामी म्हणाले की , समाजातील ईतर दानशूरांप्रमाणे चिंचवड देवस्थान ट्रस्टने राम मंदिर उभारणीसाठी खारीचा वाटा उचलला ही कौतुकाची बाब आहे . ही देणगी म्हणजे मंदिर उभारण्यासाठी जणु गणेशाचा कृपाआशीर्वाद व प्रसाद आहे .