इंदापूर प्रतिनिधी आदित्य बोराटे
इंदापूर येथील महिला अलका शिवाजी वीर (वय ६० वर्ष रा. तापी सोसायटी इंदापूर) येथे वास्तव्यास आहेत. या महिलेचे जालना येथील खाजगी संस्थेत लाखो रुपये अडकले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलका शिवाजी वीर या महिलेने परिवर्तन ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड जालना या खाजगी संस्थेत दाम दुप्पट योजनेसाठी ५ लाख ३७ हजार रुपये रक्कम गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीचा कार्यकाळ संपून सुद्धा ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था कंपनी व त्यांचे एजंट हे रक्कम परत देण्यास वारंवार टाळाटाळ करत असल्याने अलका शिवाजी वीर यांनी काही महिन्यांपूर्वी या संस्थेच्या नावे इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावरून बारामतीचे विभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाने इंदापूर पोलिस स्टेशनचे संबंधित अधिकारी यांनी परिवर्तन ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व एजंट त्यांच्यावर क्राईम ५१/२१नुसार कलम ४२०(फसवणूक करणे),कलम ४०९(विश्वास घात करणे),कलम४६७,४६८ (फसवणूक करण्यासाठी बनावटी करणे),व कलम ३४(सामायिक इरादा) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
यातील आरोपी कंपनीचे संचालक विठ्ठल पवार व लोखंडे,तसेच कंपनीचे तीन एजंट यांना अटक करून न्यायालयाच्या आदेशाने पूर्ण रक्कम त्या महिलेस मिळवून दिली आहे. इंदापूर पोलीस स्टेशनच्या कारवाईने महिलेस अडकलेली ५ लाख ३७ हजार रुपये रक्कम मिळवून दिली. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे विभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, स.पो. नि. बिरप्पा लातुरे, ए.पी. आय.अजित जाधव,पो. कॉ.गुरव,पो. कॉ.नवले यांनी केली.
सदरच्या कारवाई वरून फिर्यादी महिला अलका वीर यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व त्यांच्या पथकाचे सत्कार करून पेढे, वाटून मनःपूर्वक आभार व्यक्त केले.