सोमेश्वरनगर प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चालु गळीत हंगामामध्ये १४० दिवसात आजअखेर ८ लाख ४८ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले असुन आजच्या तारखेस साधारण ४ लाख मे. टन ऊस कार्यक्षेत्रात शिल्लक आहे. हा संपुर्ण ऊस सोमेश्वरला संपवण्यासाठी मे अखेर पर्यंत कारखाना गळीत हंगाम चालु ठेवावा लागणार असुन तशी व्यवस्थापनाची तयारी आहे. हा संपुर्ण ऊस गाळप करण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असुन या कामी सभासदांनी कारखान्याच्या व्यवस्थापनास सहकार्य करावे असे आवाहन श्री सोमेश्वर सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन श्री.पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
श्री.जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हंटले आहे की, सध्या कार्यक्षेत्रात दहाव्या व आकराव्यातल्या लागणीच्या तोडी सुरु असुन सोबत बाराव्यातील खोडव्याच्या तोडी सुरु आहेत. काही सभासद शेजारील कारखान्यांना गाळपासाठी ऊस देत असुन अशा प्रकारे तुटुन जाणार्या ऊसाची कोणतीही जवाबदारी (पेमेंट अथवा ऊसदर) सोमेश्वर कारखान्यावर असणार
नाही याचीही कृपया सभासदांनी नोंद घ्यावी.
श्री.जगताप पुढे म्हणाले की, सोमेश्वरच्या ऊसतोड कामगारांनी सभासदांची अडवणुक करत त्यांच्याकडुन पैशाची मागणी केली तर सभासदाने कारखान्याकडे लेखी तक्रार करावी. सदर तक्रारीची योग्य ती दखल घेवुन, शहनिशा करुन कारखाना व्यवस्थापन त्या सभासदाला त्याचे पैसे ऊस कंत्राटदाराच्या बीलातुन वसुल करुन देण्याची व्यवस्था करेल.