Type Here to Get Search Results !

माझी वसुंधरा अभियानात निसर्गतत्व आणि विकासाचा समन्वय

माझी वसुंधरा अभियानात निसर्गतत्व आणि विकासाचा समन्वय
पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून  शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्याबाबत आणि पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण करण्यात  ‘माझी वसुंधरा अभियाना’चा पहिला टप्पा यशस्वी ठरला आहे. त्यात  पुणे जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली असून दुसऱ्या टप्प्यात हे अभियान अधिक गतीने  नेण्यासाठी जिल्हा सज्ज झाला आहे.

  माझी वसुंधरा अभियानात वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे,  जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण, उर्जेचा परिणामकारक वापरासह मानवी स्वभावातील बदलांसाठीच्या प्रयत्नांचादेखील विचार करण्यात आला आहे. पुणे जिल्हा विकासाच्या नव्या कल्पना स्विकारण्यात नेहमीच पुढे राहिला आहे. म्हणूनच अभियानाच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाला सुरुवातीपासून नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले.

 उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार स्वत: स्वच्छता आणि पर्यावरणविषयी नेहमीच आग्रही असतात.  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनीदेखील कोविडचे संकट असतानाही ई-संवादाच्या माध्यमातून  प्रत्येक स्तरावर अभियानाबाबत जागरूकता निर्माण केली. त्यांनी अभियानाचे नेतृत्व करताना विविध मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. घनकचरा व्यवस्थापन, एलईडी दिव्यांचा उपयोग, उद्यानाची निर्मिती, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाची शपथ, सौर ऊर्जेचा उपयोग, जनजागृतीचे उपक्रम आदींच्या माध्यमातून अभियानाला गती देण्यात आली. अभियानासाठी आवश्यक निधी वित्त आयोग  आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला.

जिल्ह्यात १३ नगरपरिषदा १ नगरपंचायत आणि दोन्ही महानगरपालिकांनी माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेतला होता. अभियान कालावधीत वृक्ष लागवड, हरित पट्टे विकास,  विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे, सायकल रॅलीचे आयोजन, प्लास्टिकमुक्तीसाठी अभिनव कल्पना,  सौर ऊर्जेचा वापर, सांडपाणी व्यवस्थापन आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.

या प्रयत्नांना चांगले यश आले. माझी वसुंधरा अभियान २०२०-२१ मध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. सहभागी १६ नागरी स्थानिक संस्थांपैकी ७ नागरी संस्थांनी राज्यातील पहिल्या ५० मध्ये स्थान मिळविले. त्यात ३ नागरी संस्था पहिल्या १२ मध्ये आल्या. अभियानाचा फायदा स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ स्पर्धेसाठीदेखील झाला. या स्पर्धेत लोणावळा आणि सासवड नगर परिषदेला राष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. स्वच्छतेच्या बाबतीत पुणे शहर देशात पाचवे आले. याशिवाय जुन्नर, जेजुरी, इंदापूर नगर परिषदांचा कचरामुक्त शहर म्हणून गौरव करण्यात आला. हे प्रेरक यश सोबत घेऊन जिल्हा आता अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळला आहे.

अभियानाची मूळ संकल्पना शाश्वत विकासावर आधारीत आणि जागतिक स्तरावर सुरू असलेल्या पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांना अनुसरून आहे. महाराष्ट्राने नेहमीच नव्या काळाची आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार विकासाच्या कल्पनेला आकार दिला आहे. एका बाजूस पयाभूत सुविधांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत औद्योगिक विकासाला चालना देत असताना ‍निसर्गाशी असलेले नाते तेवढ्याच संवेदनशिलतेने जपण्याचे प्रयत्न करण्यावर शासनाचा भर आहे. ‘माझी वसुंधरा अभियान’ या प्रामाणिक प्रयत्नांचा एक भाग आहे, तर ‘सीओपी-२६’ परिषदेत ‘प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व’ महणून महाराष्ट्राचा  जागतिक स्तरावर झालेला सन्मान ही या प्रयत्नांना मिळालेली पावती आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पर्यावरण रक्षणाची ही चळवळ पुढे नेण्यासाठी राज्याने अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे.

 पुणे जिल्ह्यानेदेखील त्यासाठी आवश्यकत तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यातील यश अधिक पुढे नेत राज्य आणि देशपातळीवर अग्रेसर राहण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन सुरू केले आहे. यावर्षी ग्रामपंचायतींचा सहभादेखील लक्षणीय आहे. या अभियानात अर्थातच जनतेचा सहभाग हा सर्वात महत्वाचा घटक आहे. सभोवतीचा निसर्ग आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी जपायचा आहे ही भावना विकसीत होऊन त्या अनुरूप कृती अधिक विस्तारल्यास आपले जीवन अधिक सुखकर करण्यासोबत पर्यावरण रक्षणाची चळवळ गतीमान करण्यातही आपले योगदान देण्याची संधी आहे. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या प्रयत्नातून  अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्याचे शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार पाऊ पडेल यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test