कशासाठी-लिंगभाव समतेसाठी’ या विषयावरील अनुभव लेखन पाठविण्याचे आवाहन
पुणे, दि. १५:- मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून ‘कशासाठी-लिंगभाव समतेसाठी’ या विषयावरील अनुभव लेखन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी त्यांचे अनुभव, लेख २५ मार्च२०२२ पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे. आपले अनुभव मराठी भाषेत पाठवावेत. आपले अनुभव लेखन
https://forms.gle/Einmx6jvspa7CEh48
या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावे. 'कशासाठी? - लिंगभाव समतेसाठी’ या विषयावर अनुभव लेखन पाठवणाऱ्या व्यक्तीचाच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून संपर्क साधावा. २५ फेब्रुवारी २०२२ ते २५ मार्च २०२२ या काळात आलेले लेखनच ग्राह्य धरले जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून निवडक लेखाचे पुस्तक प्रकाशित केले जाणार असून पुस्तकात लेख प्रसिद्ध करताना त्यात आपल्या नावाचा उल्लेख करायचा की नाही, याविषयीचा निर्णय संबंधित व्यक्तीचा असेल.
निवडक लेखांना ‘पुन्हा स्त्री उवाच’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आलेल्या अनुभव लेखनातून पुस्तकासाठी लेख निवडण्याचा अंतिम अधिकार परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. एखाद्या सहभागीच्या लेखनावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची राहील.
अनुभव लेखनाची शब्दमर्यादा ७०० ते १२०० आहे. लेखन काल्पनिक किंवा तात्त्विक स्वरूपाचे नसावे, तर अनुभवाधारित असावे. लेखन शक्यतो युनिकोड टंकलिखित असावे. ते शक्य नसेल तर सुवाच्य हस्ताक्षरात लिहून, अक्षरे स्पष्ट दिसतील असे फोटो काढून त्यांची पीडीएफ पाठवावी. सुट्टया इमेजसचा, फोटोंचा विचार केला जाणार नाही.
समता आपल्या संविधानातील एक महत्वाचे मुल्य आहे. त्यादृष्टीने स्त्री, पुरुष, तृत्तीयपंथी यांनी आपल्या जगण्यात लिंगभाव समता आणण्यासाठी केलेले प्रयत्न, संघर्ष, अनुभव या उपक्रमासाठी लिहून पाठवायचे आहेत. आपले हे अनुभव इतरांनाही लिंगभाव समता आणण्यासाठी प्रेरणादायी ठरतील.
स्त्रियांनी लिंगभाव समतेसाठी केलेल्या संघर्षाचे अनुभव लिहिताना घरातल्या आणि घराबाहेरच्या संघर्षाला कसे तोंड दिले, या संघर्षात नातेवाईक, आई, वडील, भाऊ, पती, बहीण आदी किवा मित्रमैत्रिणी, कार्यालयीन सहकारी यांचा पाठिंबा मिळाला का? कशाप्रकारे मिळाला? कोणत्या अडचणी आल्या? या संघर्षात संबंधितांना लिंगभाव समतेची जाणीव करून देण्यात आलेले यश-अपयश, याविषयीचे अनुभव लिहून पाठवायचे आहेत.
पुरुषांनी नात्यातल्या आई, बहीण, मुलगी, पत्नी इ. किंवा मैत्रीण, कार्यालयीन सहकारी यांच्यावर बाई म्हणून होत असलेल्या अन्यायावर काय भूमिका घेतली? त्या स्त्रीच्या संघर्षात कसे सहकार्य केले? याविषयीचे अनुभव लिहून पाठवायचे आहेत.
तृतीय पंथीयांनी स्त्री-पुरुष यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत, याची जाणीव झाल्यावर कुटुंबाने, नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी स्वीकारले का? त्यांची काय भूमिका होती? त्यांच्या प्रतिक्रियांना, वागण्याला कसे तोंड दिले किंवा कसे स्वीकारले? याविषयीचे अनुभव लिहून पाठवायचे आहेत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सांवत यांनी दिली आहे.