Type Here to Get Search Results !

देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करावा......

देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र 
बनविण्यासाठी प्रयत्न करावा......
पुणे -  जखमी आणि वेदनेने त्रासलेल्या वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी बावधन वन्यप्राणी उपचार केंद्रामुळे मोठी सोय झाली असून ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हे उपचार केंद्र  देशातील सर्वोत्तम वन्यप्राणी उपचार केंद्र 
बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

एनडीए रस्त्यावरील बावधन वन परिक्षेत्रात वन विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या वन्यप्राणी उपचार केंद्राच्या लोकार्पण  कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार भिमराव तापकीर, पुणे क्षेत्र प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, प्रादेशिक उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, वनीकरण आणि इको टुरिझम सहायक उपवनसंरक्षक दीपक पवार  उपस्थित होते.

वनमंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, निसर्गाने सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. या सृष्टीतील पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाची जबाबदारी मानवाची आहे. वन्यप्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड करुन मानवाने वन्यप्राण्यांना उपेक्षित केले आहे. निसर्गरम्य ठिकाणी या उपचार केंद्राची स्थापना करण्यात आली असून येथे सुमारे चारशे जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करता येणार आहे. या उपचार केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुमारे २८ कोटी रुपये खर्च करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे ३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही वेळेत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात वनविभागामार्फत वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही श्री.मुनगंटीवार म्हणाले.

*‘जिथे वन, तिथे जीवन'*

भारताने वन व्यवस्थापनाचा आदर्श  जगाला दिला आहे. पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत असताना तो राखण्यासाठी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे.  'जिथे वन तिथे जीवन' असल्याने वृक्षारोपणासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने 'अमृत वन उद्यान' उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्रातील दुर्मिळ प्रजाती, प्रमुख वृक्ष औषधी वनस्पती असे ४०० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे  त्यांनी सांगितले.

आमदार भीमराव तापकीर यांनी वारजे, तळजाई आणि सिंहगड परिसरातील वन विभागाची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावी आणि नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असे सांगितले.

 प्राण्यांच्या उपचारासाठी केंद्राची आवश्यकता होती आणि महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे उपचार केंद्र असल्याची माहिती  उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. 

 कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण केले आणि उपचार केंद्रातील विविध सोयी सुविधांची पाहणी करुन माहिती घेतली. वन विभागाच्या अधिकाऱी आणि कर्मचारी यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test