बारामती विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी प्रशासन सज्ज
बारामती - बारामती विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले असून सर्व साहित्य सुस्थितीत मतदान केंद्रावर पोहचले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या *३ लाख ८१ हजार १५७ आहे.* *त्यापैकी १ लाख ९२ हजार ८१९ पुरुष मतदार, १ लाख ८७ हजार ७६५ महिला, सैनिक ५४९ मतदार, २४ इतर मतदार आहेत.*
बारामती मतदारसंघांमध्ये एकूण ३८६ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी ३९ टेबल ची व्यवस्था करून *७७२ बॅलेट युनिट, ३८६ कंट्रोल युनिट, ३८६* व्हीव्हीपॅट यंत्राचे वितरण वखार महामंडळ, औद्योगिक वसाहत (MIDC) बारामती येथून केंद्रनिहाय मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. राखीव व्हीव्हीपॅड यंत्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. ३८६ मतदान केंद्रावर एकूण १ हजार ९४३ मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर अधिकारी आणि कर्मचारी यांना नेण्यासाठी एकूण ४७ एस.टी. बसेस ,१५ खाजगी मिनी बसेस, ९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. बारामती करिता ४० क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी ३९ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे.
बारामती मतदारसंघांमध्ये १९३ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यामध्ये ३० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, ३८६ पोलीस कर्मचारी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स १ प्लाटून, आरपीएफ हरियाणाचे २ प्लाटून मिळून ७० जवान नियुक्त करण्यात आले आहेत.
मतदारांच्या स्वागतासाठी विशेष मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मॉडेल मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा दत्तवाडी, गुणवडी, पिंक मतदान केंद्र सामाजिक न्याय विभाग मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत जळोची, दिव्यांग मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा माळेगाव बुद्रुक, युवक मतदान केंद्र महाराष्ट्र एज्युकेशन हायस्कूल बा.न.प. बारामती, विशेष मतदान केंद्र जिल्हा परिषद शाळा डोर्लेवाडी येथे स्थापन केले आहे.