बारामतीतील हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा शानदार सोहळा संपन्न
बारामती प्रतिनिधी ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा शानदार सोहळा रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी भारताचा ७६ वा गणतंत्र दिन शाळेच्या मैदानावर मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७.३० वा. माननीय प्रमुख पाहुणे सुभेदार मेजर श्री. लालासाहेब तुकाराम कदम यांच्या हस्ते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ध्वजावतरण व ध्वजवंदन झाले. या वेळी विद्यार्थीनींनी राष्ट्रगीत आणि ध्वजगीत यांचे देशभक्तीने भारावलेल्या स्वरात गायन केले. त्यानंतर शाळेतील इ. १०वीची विद्यार्थिनी कु. तनिष्का गावडे हिने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.
यानंतर विद्यार्थ्यांच्या संचलन पथकाची पाहणी प्रमुख पाहुण्यांनी केली आणि ध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी संचलन केले.
तद्नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी कवायत साहित्य वापरून सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार सादर केले. सामूहिक कवायती नंतर रोमांचित करणारा अनुभव सर्वांनी घेतला तो म्हणजे घोष पथकाचे शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट सादरीकरण. या नंतर सीनियर केजी चा विद्यार्थी चि.अद्वैत नितीन पोळ आणि इ.५ वीचा विद्यार्थी चि.अधिराज जाधव यांनी आपली वक्तृत्व कला सादर केली. वक्तृत्वानंतर वेळ होती सामूहिक गायनाची. इ. ३री व ४थी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी इंग्रजी व हिंदी भाषेमधील देशभक्तीपर गीते सादर केली. यानंतर इ. ८वी व ९वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. यानंतर इयत्ता ६वी व ७वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कराटे खेळाच्या प्रात्यक्षिकांचे व लढतींचे मोठ्या जोशात सादरीकरण केले. यानंतर इ. ३री, ४थी आणि ५वीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनातील काही प्रकार सादर केले. कार्यक्रमात पुढे मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भारतीय संविधान त्यातील मार्गदर्शक तत्वे, नागरिकांची हक्क व कर्तव्य या संदर्भात मार्गदर्शन केले. आपला भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही राज्यव्यवस्था असणारा देश असून विविधतेत एकता आणि बंधुता जपणारा एकमेव देश असल्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. अशा सार्वभौम लोकशाही देशाचे सक्षम नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी सजग होणे गरजेचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सत्कारास उत्तर देताना प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी त्यांचा लष्कर सेवेतील अनुभव आणि कारगिल युद्धातील काही प्रसंग नमूद केले. सैनिकांच्या आयुष्यातील खडतर प्रवासाचे वर्णन ऐकून विद्यार्थी व उपस्थित पालक आणि शिक्षक रोमांचित झाले. सैनिकांचे जीवन अत्यंत खडतर असते हे सांगणारे अनेक प्रसंग यावेळी सुभेदार कदम यांनी सांगितले. आपल्या रोजच्या जीवनात ही शिस्त पाळून स्वच्छता पाळून आपण आपली देशभक्ती व्यक्त करू शकतो आणि त्यासाठी आपण सजग असले पाहिजे. तसेच पालकांनीही अशा राष्ट्रीय उत्सवात सक्रिय सहभागी व्हायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. सुमित्रा निकम यांनी केले. सदर कार्यक्रमात पालकांचा ही सहभाग होता.
आजचा गणतंत्र दिवसाचा कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री.अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी सर, मएसो नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री. पी.बी. कुलकर्णी सर, व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.