स्पुक्टो च्या सरचिटणीसपदी प्रा.डाॅ. प्रवीण ताटे देशमुख यांची बिनविरोध निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा.काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथील उपप्राचार्य प्रा.डाॅ.प्रवीण ताटे देशमुख यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या ( स्पुक्टो ) सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली. गेली पाच वर्षे ते स्पुक्टो चे पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहत होते. तसेच एम.फुक्टो च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणूनही ते जबाबदारी पार पाडत आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील अपप्रवृत्ती विरोधातील विद्यापीठ, राज्य व देशपातळीवरील अनेक आंदोलने यशस्वी करण्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून सर्वसामान्य उपेक्षित , वंचित समाज घटकांना दर्जेदार उच्च शिक्षण देणारी शिक्षणप्रणाली टिकली पाहिजे यासाठी स्पुक्टो सतर्क असते. या निवडीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे , अहिल्यानगर व नाशिक जिल्हातील सर्व प्राध्यापकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
स्पुक्टो संघटनेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून गेल्या ५० वर्षात अनेक मोठी आंदोलने यशस्वी करून संघटनेने प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे हीत साधलेले आहे. प्रा.ताटे देशमुख यांचे दोन ग्रंथ व ४८ संशोधन पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवरील आदर्श प्राध्यापक पुरस्कारानेही ते सन्मानीत आहेत.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे देशमुख, . अभिजित काकडे देशमुख, प्राचार्य डाॅ. देविदास वायदंडे , सचिव श्री.सतीश लकडे. एम.फुक्टो चे अध्यक्ष डाॅ. एस.पी.लवांडे, डाॅ. के.एल.गिरमकर, प्रा.मगन ताटे, डाॅ. व्हि.एम शिंदे व डाॅ. रमेश गायकवाड यांच्यासह राज्यभरातील प्राध्यापकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.