सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता ८ वी व ९ वीच्या मुला मुलींच्या मिश्र क्रिकेटचा सामना रंगला.
यावेळी प्रत्येक संघाला ८ षटकांची खेळी करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये इयत्ता ८ वीच्या संघाने ८ षटकात ४ गड्यांच्या बदल्यात १०७ धावांचे लक्ष समोरच्या संघाला दिले.
उत्तरादाखल इयत्ता ९ वीने फलंदाजी करत ३८ धावांत आपले सगळे गडी गमावले व इयत्ता ८ वीने ६९ धावांच्या फरकाने सामना सहज जिंकला.
सामनावीर श्रीयश हिरवे, उत्कृष्ट गोलंदाज अभिराज कदम, उत्कृष्ट फलंदाज श्रीराज वाघ ठरले. इयत्ता ८ वीच्या विजेता संघाचे नेतृत्व अथर्वराज भोसले याने केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी विजेत्या संघाला चषक देऊन त्यांचे अभिनंदन केले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी सामन्याला उपस्थिती दर्शवली.या संपूर्ण सामन्याचे आयोजन क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजीत देशमुख यांनी केले. सामन्याची समलोचन धीमन ग्यारा, गायत्री सरोदे व स्वराली भापकर यांनी केले.



