तुम्ही परिपूर्ण होण्याचे ध्येय ठेवू नका तर प्रगतिशील होण्याचे ध्येय ठेवा - प्रा. मनीषा गोंधळे
निर्णय घेण्याची कौशल्य विकसित करणे आणि चांगले मानसिक आरोग्य राखणे हे प्रत्येक मुलगी आणि महिलेसाठी विशेषतः आजच्या गुंतागुंतीच्या आणि वेगवान जगात आवश्यक आहे. तुम्ही परिपूर्ण होण्याचे ध्येय ठेवू नका तर प्रगतिशील होण्याचे ध्येय ठेवा." असे प्रतिपादन प्रा. मनीषा गोंधळे यांनी स्वास्थ्य आणि परिस्थिती ज्यांनी निर्णय क्षमता या विलषयावर बोलताना केले. मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत 'महिला सबलीकरण व सक्षमीकरण' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. याप्रसंगी ते म्हणाले की, "आजची स्त्री सक्षम आहेच. तरीही त्यांनी अगोदर आर्थिक सक्षम व्हावे; तरच त्या स्वतःचा निर्णय घेऊ शकतील आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतील. तसे पाहिले तर आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. तरीही तिला तिच्या हक्काचे रक्षण करणे, तिला प्रत्येक क्षेत्रात समान संधी देणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याने आपण अशा कार्यशाळांचे आयोजन करतो."
एडवोकेट ऐश्वर्या गांधी 'महिला संरक्षण विषयक कायदे आणि तरतुदी' या विषयावर बोलताना म्हणाल्या की, "अशा कार्यशाळा केवळ महिलांसाठीच नाही तर समाजातील ज्या घटकांमुळे महिलांना त्रास होतो अशा सर्व घटकांचे प्रबोधन झाले, तरच महिलांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलेल."
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि समिती सदस्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. निलेश आढाव, डॉ. आदिनाथ लोंढे, डॉ. नारायण राजूरवार, प्रा. पोपट जाधव, प्रा. मेघा जगताप यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे यांनी केले तर प्रस्ताविक कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. जया कदम यांनी केले. आभार प्रा. शिल्पा कांबळे यांनी मानले.