सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आपल्या कार्यक्षमता, तांत्रिक उत्कृष्टता आणि ऊस विकासातील भरीव कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमठवला आहे. दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित सोहळ्यात, गाळप हंगाम २०२३-२४ साठी ‘उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ हा मानाचा पुरस्कार सोमेश्वरला प्रदान करण्यात आला.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री निमुबेन बंभानिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व अधिकारी यांनी हा सन्मान स्विकारला. यावेळी श्री. जगताप म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे फक्त गौरव नव्हे, तर आमच्यावरची जबाबदारीही वाढली आहे. सभासद शेतकरी व कारखान्याशी संबंधित प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून चार पुरस्कार मिळालेले असले तरी, हा पहिलाच राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार सोमेश्वर कारखान्याला प्राप्त झाला आहे, याकडेही पुरुषोत्तम जगताप यांनी लक्ष वेधले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कारखान्याचे मार्गदर्शक अजितदादा पवार यांचे सततचे मार्गदर्शन आणि सभासद शेतकरी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान यामुळेच हा यशश्रीचा सोहळा शक्य झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.