महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता, आषाढी वारी-२०२५ दरम्यान वारी सुरु झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वारकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना यामुळे एक दिलासा मिळणार आहे.
राज्य शासनाने केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (एसडीआरएफ/ एनडीआरएफ) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना द्यायवाच्या मदतीचे दर व निकर्ष २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार लागू केले होते. याप्रमाणे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता मदतीचे दर असणार आहेत.
ही मदत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त तसेच आत्महत्या, विषबाधा, खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या मृत व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांकरिता अपंगत्व, इस्पितळाचा खर्चाच्या अनुषंगाने आर्थिक मदत देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
ही मदत आषाढी वारी-२०२५ करिता वारी सुरु झाल्याची तारीख अर्थात १६ जून २०२५ ते वारी समाप्त होण्याची तारीख १० जुलै २०२५ दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी, सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू असणार आहे. वारीदरम्यान अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारांस ४ लाख रुपये, अपघात किंवा दुर्घटनेमुळे ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये आणि ६० टक्क्याहून अधिक अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार रुपये, एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल असल्यास १६ हजार रुपये तसेच एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल असल्यास ५ हजार ४०० रुपये याप्रमाणे वारकरी अथवा त्याचे वारसदारास रक्कम मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत वारकरी किंवा त्यांच्या वारसाने सानुग्रह अनुदान मागणी करण्याबाबतचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करावा. संबंधित वारकरी आषाढी वारी-२०२५ करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे तहसीलदाराचे प्रमाणपत्र मदतीच्या अर्जाबरोबर जोडावे. तहसिलदारांनीही संबंधित वारकरी हे आषाढी वारी-२०२५ करिता गेल्याची खात्री करुन संबंधित वारकरी अथवा त्याचे वारसदारांच्या मागणीनुसार प्रमाणपत्र द्यावे.
राज्य शासनाकडून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक् मदतीबाबत संबंधितांना रक्कम मंजूर करुन वितरीत करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू, वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात सानुग्रह अनुदान मंजूर करुन वितरित करण्यात येणार आहे.
संकलन: उप माहिती कार्यालय, बारामती