सोमेश्वरनगर: आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या माध्यमातून मु.सा काकडे महाविद्यालयात सहज योग ध्यानधारणा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी रशिया ऑस्ट्रेलिया युक्रेन सह भारत देशातील कलाकार महाविद्यालयात आले होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परदेशातून आलेल्या कलाकारांमध्ये मेल्स ऑलिना (युक्रेन) आणि व्होलीर वेगर रॉनीजर व्हायलेटटा (ऑस्ट्रेलिया) रॉनीजर ॲना, पारीझो इरीना व क्रशन डेनवाल (रशिया) सचिन सैनी या आंतरराष्ट्रीय कलाकारांनी संगीत व ध्यानधारणा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ध्यान धारणेच्या माध्यमातून मनाला शांती मिळून एकाग्रता वाढवण्यावर कसा भर दिला जातो हे सांगितले.नियमित ध्यान धारणी मुळे राग चिंता नैराश्य कशी कमी होते व सकारात्मकता कशी वाढीस लागते तसेच श्री प्रदीप सोळसकर यांनी विद्यार्थ्यांना कुंडलिनी शक्ती जागृत केल्याने मन शांत होते.आहार, विहार आणि विचार संतुलित ठेवल्यास कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना ध्यान धारनेमुळे व योगामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होऊन गुणवत्ता सुधारण्यास कशाप्रकारे मदत होते हे प्रात्यक्षिकासह सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांच्या शुभहस्ते झाले या प्रसंगी त्यांनी उपस्थित परदेशी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात परदेशी पाहुण्यांना महाविद्यालयाविषयी माहिती दिली व ग्रामीण भागातील संस्कृती त्याचबरोबर महाविद्यालयातील उपक्रमाविषयी माहिती देऊन त्यांना ग्रंथालयासह महाविद्यालयाच्या विविध विभागांविषयी माहिती दिली. ध्यानधारणा, योगामुळे शरीराची ताकद आणि शक्ती वाढते. शारीरिक संतुलन सुधारते .चिंता, तणाव कमी होऊन जीवन सुखकर होते.
कार्यक्रमासाठी महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे नियोजन आयक्यूएसी समन्वयक डॉ.संजू जाधव व प्रा दत्तराज जगताप यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बी.एन.मरगजे यांनी केले डॉ. श्रीकांत घाडगे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.