मुख्य संपादक विनोद गोलांडे....
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (यु.आय.डी. - बी०२१) विभागाच्या वतीने दिनांक ०८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘शिक्षक दिन समारंभ’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात श्री. जे. ई. पवार व प्रा. विष्णू लडकत यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. श्री. जे. ई. पवार यांनी आपल्या व्याख्यानात भारतातील शिक्षणव्यवस्थेचा ऐतिहासिक आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, भारतामध्ये लॉर्ड मेकॉले यांनी १८४५ साली इंग्रजी शिक्षण पद्धती आणली. ब्रिटिश शिक्षण कायद्यामुळे शिक्षणाला काही प्रमाणात फायदा झाला. भारतीय महिलांना शिक्षणाची संधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे मिळाली. त्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षण सर्व समाजासाठी खुले केले. शिक्षण म्हणजे वर्तनातील परिवर्तन असून "जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी सांगावे; शहाणे करून सोडावे सकळ जण" हा संत तुकाराम महाराजांचा अभंगही त्यांनी यावेळी सांगितला. पुढे बोलताना श्री. पवार यांनी सांगितले की आज बदललेला अभ्यास, चॅट जीपीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानातील बदल यामुळे शिक्षण व्यवस्थेत मोठे परिवर्तन झाले असले तरी शिक्षकांचे महत्त्व अबाधित आहे आणि कायम राहील.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षक हा राष्ट्र बांधणीचा घटक असल्याचे प्रतिपादन केले. "शिक्षकांना सन्मानाबरोबर कर्तव्यही येतात. शिक्षण म्हणजे शहाणपण येणे आणि चांगला माणूस होणे. उच्च शिक्षण जातीविरहित समाज व्यवस्थेची निर्मिती करते. शिक्षकाला सामाजिक संवेदना असतात, परंतु सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर सरकारचे लक्ष नाही. शिक्षण हे पवित्र असले पाहिजे. शिक्षक हा जग बदलण्याचा मार्ग आहे. शिक्षणातून मानवी विकास होतो. शिक्षणातून शुद्ध अंतःकरण घडते; असूया, द्वेष नष्ट होतो आणि एक चांगला माणूस तयार करण्याचे कार्य शिक्षक करत असतात. शिक्षकांमध्ये नैतिकता असते. शिक्षण हे सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी आवश्यक आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘एक दिवस शिक्षक’ म्हणून अध्यापनाचे कार्य केले. शिक्षक व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे कामकाज सांभाळले. यावेळी शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कु. अमृता गायकवाड व संकेत साळवे यांनी याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमात श्री. सतिश लकडे, डॉ. जवाहर चौधरी, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. गेनू दरेकर, डॉ. जया कदम, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. निलेश आढाव, डॉ. राहुल खरात, डॉ.प्रविण ताटे, डॉ. संजू जाधव, डॉ. नारायण राजूरवार, प्रा. पोपट जाधव आदी मान्यवर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे (कार्यक्रम अधिकारी, रा.से.यो.) यांनी केले. अतिथी परिचय ज्ञानेश्वरी गायकवाड यांनी करून दिला, तर संकेत साळवे यांनी आभार प्रदर्शन केले.