Type Here to Get Search Results !

आविष्कार संशोधन स्पर्धेतून भारतीय दूत निर्माण होतील- डॉ. विनायक जोशी

आविष्कार संशोधन स्पर्धेतून भारतीय दूत निर्माण होतील- डॉ. विनायक जोशी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मु.सा. काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्तरावरील आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे विद्यापीठ आयक्यूएसी समन्वयक डॉ. विनायक जोशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माणसाकडे शिकण्याची उर्मी उपजत असते पण त्याला दिशा देण्याचे काम शिक्षण क्षेत्र करत असते. आविष्कार संशोधन स्पर्धा ही संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ राबवते. कोणतेही संशोधन करण्यासाठी सातत्याने प्रयोग करत रहावे लागते. प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी तरुणांमध्ये संशोधन होणे गरजेचे आहे व अविष्कार स्पर्धा ही विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या स्पर्धेचे उद्घाटन अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनाला प्राधान्य दिले आहे. आधुनिक संशोधनासाठी भारतीय ज्ञान परंपरा पूरक आहे. तसेच अविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृद्धी वाढीस लागली आहे जसे की कला शाखेतील विद्यार्थ्याला कृषी क्षेत्रामध्ये संशोधन करता येते वाणिज्य शाखेतील  संगणक क्षेत्रामध्ये संशोधन करता येते हे अविष्कार मुळे शक्य झाले आणि शेवटी अविष्कार मुळेच विद्यापीठाचे रँकिंग सुधारले आहे असे मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अभिजीत काकडे- देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आविष्कार संशोधन समितीचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री. सतीशराव लकडे, डी वाय पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वामन, आविष्कार जिल्हा समन्वयक सौ. शुभांगी शिंदे , परीक्षक, शिक्षक- शिक्षकेतर, कर्मचारी व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
         या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना एक मोठे व्यासपीठ मिळाले‌. संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला या विभागीय स्पर्धेमध्ये पुणे विभागातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी, तसेच संशोधन करणारे विद्यार्थी या तीन स्तरांवर मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी मानव्यविद्या, वाणिज्य, मूलभूत शास्त्रे, कृषी, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शास्त्र अशा विविध गटातील आपले संशोधन प्रकल्प आणि पोस्टर्स उत्साहाने सादर केले. यामध्ये गुणवत्तापूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण स्पर्धकांनी सादर केले. अनेक प्रकल्प सामाजिक, वैज्ञानिक, आणि तांत्रिक समस्यावर व्यवहार्य आणि नाविन्यपूर्ण उपाय योजना सुचवणारे होते.
         यावेळी विकास समितीचे अध्यक्ष श्री अभिजीत काकडे -देशमुख यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन या आविष्कार स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन वृद्धी वाढण्यास मदत होणार आहे, असे मत मांडले. अध्यक्षीय मनोगता मध्ये प्राचार्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजावी, नवीन कल्पना सुचण्यासाठी प्रोत्साहन देणे, शैक्षणिक प्रतिभा अभिव्यक्तीसाठी संधी प्रदान करून संशोधनाला प्रोत्साहन देणे हे आविष्कार स्पर्धेचे उद्दिष्ट आहे, असे विचार मांडले शेवटी या स्पर्धेचे परीक्षण निकोप वातावरणामध्ये पार पडेल अशी हमी दिली. 
        या स्पर्धेत पुणे शहरातील विविध महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. मानव्य, भाषा आणि ललित कला विद्या शाखा ४२, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी विद्या शाखा ४४, विज्ञान विद्या शाखा ५४, कृषी आणि पशुसंवर्धन शाखा ३९ आणि इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी शाखेचे ६७, आणि औषध निर्माण शास्त्र विद्या शाखा ५४ असे एकूण ३०५ संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. एकूण ७५० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले.
         डॉ. संजय झगडे, डॉ. विनोद कुलकर्णी, डॉ. प्रज्ञा जगताप, डॉ. अभिजीत लिमये, डॉ सविता कुलकर्णी, डॉ स्मिता खत्री, डॉ. सुनिता धमाणे, डॉ. विद्या पाटणकर, डॉ. रुपेश देवकाते, डॉ . माधुरी बोरावके, डॉ. गिरधर नराळे, डॉ. शशिकांत शिंदे यांनी संशोधन प्रकल्पाचे परीक्षण केले.
       या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. प्रवीण ताटे- देशमुख, आयक्यूएसी प्रमुख डॉ. संजू जाधव, डॉ.अजय दरेकर, डॉ. निलेश आढाव, आदी उपस्थित होते. स्पर्धेचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. श्रीकांत घाडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे यांनी केले तर आभार रजनीकांत गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test