बारामती : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ‘सामवेद कला महोत्सव – 2025’ या राष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील सांस्कृतिक विभागाने सादर केलेल्या ‘देवली’ या लोकनृत्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधून एकूण ९८ संघ सहभागी झाले होते. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी डोक्यावर समई संतुलित ठेवून सादर केलेल्या या चित्तथरारक नृत्यप्रस्तुतीने प्रेक्षकांची मने जिंकली. भारतासह गुजरात राज्यातील स्पर्धक आणि प्रेक्षकांनी या नृत्याला उभे राहून उत्स्फूर्त दाद दिली.
या स्पर्धा अहमदाबाद येथील श्यामप्रसाद मुखर्जी सभागृहात संपन्न झाल्या. या यशामागे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांचे मार्गदर्शन तसेच प्रा. भीमराव तोरणे, प्रा. सोमनाथ कदम यांचे विशेष परिश्रम आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर मोतीलाल शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद राजकुमार शाह (वाघोलीकर) तसेच प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी सांस्कृतिक विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



