बारामती - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी आपले अर्ज दाखल केले. त्याचवेळी प्रचंड गोपनीयता ठेवत राष्ट्रवादीकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीने नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली असून अनेक प्रबळ दावेदारांसाठी हा धक्का मानला जात आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीकडूनही एकाचवेळी सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी कुणाला मिळाली याबाबत प्रचंड गोपनीयता ठेवत राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी थेट अर्ज दाखल करण्यात आले.
राष्ट्रवादीकडून यावर्षी उमेदवारीबाबत प्रचंड गोपनीयता पाळली गेली. त्यासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्जही पक्षाकडेच घेऊन त्यातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावर्षी राष्ट्रवादीने अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे अनेक प्रबळ दावेदारांना मोठा धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी उमेदवारीबाबत साशंकता असल्याने अनेकांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचेही पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाशी युती केली आहे. त्याचवेळी इतर पक्षांनाही उमेदवारीत स्थान दिले आहे. त्यामुळं यावेळी अजित पवार यांनी बेरजेचं राजकारण करत उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाकडून दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे : सुपा गट: पल्लवी प्रमोद खेत्रे, सुपा गण : उज्ज्वला पोपट खैरे, कान्हऱ्हाटी गण: श्यामल वाबळे, गुणवडी गट : शुभांगी कचर शिंदे, शिर्सुफळ गण : अनिकेत बाळासाहेब गावडे (भाजप), गुणवडी गण : शुभांगी आगवणे, पणदरे गट: मंगेश प्रतापराव जगताप, पणदरे गण : किरण रावसाहेब तावरे, मुढाळे गण : वैशाली कोकणे, वडगाव निंबाळकर गट : रोहिणी संदीप कदम (ढोले), वडगाव निंबाळकर गण: जितेंद्र पवार, मोरगाव गण : रावसाहेब चोरमले, निंबूत गट: करण संभाजीराव खलाटे, निंबूत गण : दिग्विजय जगताप, कांबळेश्वर गण : आशा विठ्ठल वायाळ, निरावागज गट : शिवानी अभिजीत देवकाते, निरावागज गण : नितीन काकडे, डोर्लेवाडी गण : राजश्री टकले



