सोमेश्वरनगर ! मु. सा. काकडे महाविद्यालय व सायास को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्यात सामंजस्य करार
सोमेश्वरनगर- मु. सा. काकडे महाविद्यालय आणि सायास को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्यामध्ये आज सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
सायास को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेल्स एक्झिक्युटिव्हसह विविध पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला चालना देणे, रोजगारक्षमतेत वाढ करणे तसेच प्रत्यक्ष कार्यानुभव मिळवून देणे, हा या करारामागील प्रमुख हेतू आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगाराची दिशा मिळणार आहे.
या सामंजस्य कराराच्या प्रसंगी मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उद्योग-शैक्षणिक सहकार्य अत्यंत उपयुक्त असून, यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम होईल, असे मत व्यक्त केले.
सायास को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे रिलेशनशिप मॅनेजर शिवाजी कानगुडे यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार देण्याबरोबरच प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. संजू जाधव, उपप्राचार्य डॉ. जया कदम, डॉ. राहुल खरात, प्रा. रजनीकांत गायकवाड यांच्यासह सायास को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सहकारी उपस्थित होते.
या सामंजस्य करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी खुल्या झाल्या असून, उद्योग आणि शिक्षण यांचा प्रभावी समन्वय साधला गेला आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.



