Type Here to Get Search Results !

बारामती ! काऱ्हाटी गावात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या पुढाकारातून परसबाग प्रात्यक्षिक

बारामती ! काऱ्हाटी गावात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या पुढाकारातून परसबाग प्रात्यक्षिक
बारामती - शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील विद्यार्थिनींनी काऱ्हाटी गावामध्ये घराजवळील उपलब्ध जागेचा योग्य वापर करून परसबाग निर्मितीचे प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या राबविले. ग्रामीण भागातील नागरिकांना घरगुती स्तरावर भाजीपाला उत्पादनाचे महत्त्व पटवून देणे आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमात अपूर्वा घस्ते, ज्ञानदा तायडे अंकिता झेंडे, गीतांजली शिंदे, दिव्या घोरपडे, आकांक्षा व्यवहारे, प्रियांका शेवाळे आणि मानसी साळुंखे अशा एकूण आठ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. कृषी शिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थिनींना ठराविक कालावधीसाठी गावामध्ये वास्तव्य करून शेती व ग्रामीण जीवनाशी संबंधित विविध उपक्रम प्रत्यक्ष राबवावे लागतात. त्या अनुषंगाने विद्यार्थिनी काऱ्हाटी गावात वास्तव्यास असून, ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष काम करत आहेत.

परसबाग निर्मितीसाठी सर्वप्रथम घरालगत असलेल्या जागेची पाहणी करून योग्य जागेची निवड करण्यात आली. निवडलेल्या जागेची स्वच्छता करून तेथील जुने पिकांचे अवशेष, कचरा व अनावश्यक घटक काढून टाकण्यात आले. त्यानंतर जमीन भुसभुशीत करून रोप लागवडीसाठी आवश्यक त्या आकाराचे व अंतराचे बेड्स तयार करण्यात आले.
लागवडीसाठी वांगी, कांदा, टोमॅटो, मिरची या भाजीपिकांची रोपे वापरण्यात आली. तसेच दोडका, मुळा, पालक, शेपू, मेथी, कोथिंबीर, गवार, पावटा, घेवडा आदी भाजीपिकांची बियाणे पेरण्यात आली. जमिनीची ऋतूनुसार विभागणी करून त्या-त्या ऋतूस योग्य अशा भाज्यांची लागवड करण्यात आली.
लागवडीनंतर पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने ठिबक पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होऊन पिकांच्या वाढीस आवश्यक तेवढेच पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी परसबाग तयार करण्याची संपूर्ण पद्धत, भाज्यांची ऋतूनुसार निवड, घरगुती परसबागेचे आर्थिक व आरोग्यदायी फायदे तसेच लागवडीनंतर घ्यावयाची काळजी याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती दिली. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना घरच्या घरी ताज्या, स्वच्छ व पौष्टिक भाज्या उत्पादनासाठी प्रेरणा मिळाली असून विद्यार्थिनींच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test