हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.
मुख्य संपादक विनोद गोलांडे...
बारामती प्रतिनिधी - २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिन अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. दिवसाची सुरुवात शाळेच्या परिसरात ग्रंथ दिंडी काढत घोषणेतून मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व तसेच भाषेचे व वाचनाचे महत्व सांगत झाली.
मराठी भाषा गौरव दिनी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मा. डॉ. हिमगौरी वडगांवकर मॅडम, मा.प्रा. संजय शेंडे सर हे होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगण्यात आले.
तद्नंतर इ. २री ते ४थी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मराठी बोधकथा आणि इ.५वी ते इ.९वी च्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संत साहित्य या हस्तलिखितांचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि उत्साहवर्धक अशा सादरीकरणांची सुरुवात इ. ४थी तील चि. आरुष अभय लोणकर याने मराठीची थोरवी आणि गोडवा आपल्या भाषणातून व्यक्त करून केली.
कार्यक्रमात पुढे श्रीरामांच्या भक्तिगीताने इ. ४थीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर इ. ६वीच्या विद्यार्थ्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या लेखणीतून साकारलेले ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गीत अत्यंत सुरेल आवाजात सादर केले.
पुढे इ.७वीच्या विद्यार्थिनींनी ‘मातृभाषा मराठीचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे’ या विषयावर पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश अत्यंत प्रभावीपणे देण्यात आला.
नंतर इ. ४थी ते ८वी मधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित जोशपूर्ण पोवाडा सादर केला.त्यानंतर इ. ९वी तील कु. ज्ञानेश्वरी गवळी हिने पु. ल. देशपांडे लिखित ‘ती फुलराणी’ या नाटकातील नाट्यछटा बहारदारपणे सादर केली.
यानंतर इ. ९वी तील कु. अनुष्का गावडे हिने इयत्ता ७ वी तील श्री साळुंखे याच्यासह संत एकनाथ यांचे भारूड उत्कृष्टरीत्या सादर केले. भारुडाच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
पुढे कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्या सौ. सोनाली क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेविषयी मनात आणि आचरणात आपुलकी असणे आवश्यक असल्याचे सांगितले. मातृभाषा म्हणून मराठीचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. हिमगौरी वडगावकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मराठी भाषा दिन आणि मराठी गौरव भाषा दिन यांतील मूलभूत फरक स्पष्ट केला. त्यांनी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्याविषयी माहिती दिली तसेच मराठी भाषेतील विविध बोली भाषांबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
दुसरे प्रमुख पाहुणे प्रा. संजय शेंडे यांनी विद्यार्थ्यांशी हसत-खेळत संवाद साधत मराठी भाषेतील विविध गमती-जमती सांगितल्या. विविध कलागुण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. भारूड सादर करणाऱ्या अनुष्का हिला रोख बक्षीस देऊन त्यांनी तिचे प्रोत्साहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन विविध पुस्तकांचे अवलोकन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन इ. ९वी तील कु. अनुष्का गावडे आणि कु. प्रतीक्षा सरोदे यांनी प्रभावीपणे पार पाडले.
त्याचबरोबर २८ फेब्रु. २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. कार्तिकेयन नन्जाप्पान सर (सायंटिस्ट मायक्रोबायोलॉजी) आणि डॉ. भास्कर गायकवाड सर (सिनियर सायंटिस्ट) तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे व विज्ञान विषयाचे महत्त्व शिक्षिका सौ.प्राची नाईक यांनी सांगितले. इ. ६वी तील चि. वरद चितळे व इ. ८वी तील चि. सुरेंद्र सिरवी यांनी भाषणातून विज्ञानाचे महत्त्व व गरज यांविषयी आपली मते मांडली. तसेच इ. ५वी तील विद्यार्थ्यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या वेशभूषेत त्यांनी लावलेल्या शोधांची माहिती सांगितली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतातून विज्ञान दिनाचे महत्व थोडक्यात विशद करून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याचा संदेश दिला. यानंतर कार्यक्रमाची पाहुणे श्री. भास्कर गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत छोट्या छोट्या वैज्ञानिक प्रयोगांमधून दैनंदिन जीवनातील विज्ञान संकल्पना स्पष्ट केल्या. काही गमतीदार किस्से सांगून विज्ञानातील गंमत उलगडून दाखवली. पुढे कार्यक्रमाचे दुसरे सन्माननीय अतिथी श्री. कार्तिकेयन सर यांनी आपल्या वक्तृत्वामधून दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व विशद केले. विकसित देशाच्या उभारणी करता विज्ञाननिष्ठ समाज आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना एकूण बारा वर्ग खोल्यांमधून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या वैज्ञानिक प्रकल्प आणि मॉडेल्स ना भेट दिली. या विज्ञान प्रदर्शनामध्ये पूर्व प्राथमिक विभागाचे एकूण ६५ प्रकल्प तर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे एकूण २२५ प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले होते. त्यामध्ये प्रकाश संश्लेषण, जलचक्र, पेरिस्कोप, पवनचक्की, हायड्रॉलिक उचलयंत्र, वर्षाजल संधारण, पाणी शुद्धीकरण इत्यादी विविध विषयावर आधारित प्रकल्प आणि प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले.
त्या प्रत्येक सादरीकरणासं प्रमुख पाहुण्यांनी भेट दिली. प्रमुख पाहुणे आणि पालक यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना विद्यार्थी आत्मविश्वासाने उत्तरे देत होती. त्यामुळे पालक वर्गाने समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ९वी च्या तील कु.अनुष्का लोंढे आणि कु.नेत्रा धालपे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन विज्ञान विषय शिक्षिका सौ. शितल होले यांनी केले.
अशाप्रकारे २७ फेब्रु. आणि २८ फेब्रु. २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन हे अतिशय उत्साहात सांस्कृतिक समृद्धीने परिपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले.
सदर कार्यक्रमास शाला समितीचे अध्यक्ष मा.श्री. अजय पुरोहित सर,महामात्र डॉ.श्री. गोविंद कुलकर्णी सर आणि मएसो नियामक मंडळ सदस्य मा.श्री. राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री.पी.बी. कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.



