Crime News माळेगाव पोलिसांची कामगिरी: 4 लाख 11 हजारांचे 18 हरविलेले मोबाईल नागरिकांना परत
मुख्य संपादक विनोद गोलांडे
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांचे हरविलेले मौल्यवान मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची उल्लेखनीय कामगिरी माळेगाव पोलीस ठाण्याने केली आहे. मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
माळेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हरविलेल्या मोबाईल संदर्भातील तक्रारींचे अवलोकन करुन स.पो.नि. सचिन लोखंडे, प्रभारी अधिकारी, माळेगाव पोलीस ठाणे यांनी गोपनीय शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे मोबाईलचा शोध घेण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून एकूण 18 मोबाईलचा शोध घेण्यात आला.
यामध्ये बारामती तालुक्यातील सांगवी, माळेगाव बु., रामनगर, जळगाव सुपे, पेडगाव, कुतवळवाडी, शिवनगर, कांबळेश्वर, ढाकाळे आदी भागांतील नागरिकांचे विविध कंपनीचे मोबाईल समाविष्ट असून त्यांची एकूण किंमत सुमारे 4 लाख 11 हजार रूपये इतकी आहे. सदरचे सर्व मोबाईल आज शनिवार, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी तक्रार निवारण दिनानिमित्त मूळ मालकांना परत देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
विशेष बाब म्हणजे, माळेगाव पोलीस ठाणे निर्मितीपासून पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी आतापर्यंत एकूण 20 लाख 22 हजार रुपये किंमतीचे 107 मोबाईल शोधून नागरिकांना परत केले आहेत. त्यामुळे मोबाईल मालकांनी आनंद व्यक्त केला असून परिसरातील नागरिकांकडून माळेगाव पोलीस ठाण्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



