Type Here to Get Search Results !

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर 'क्रीडा ई-प्रमाण'प्रणाली कार्यान्वित*;*खेळाडूंना मिळणार आता घरबसल्या क्रीडा ई-प्रमाणपत्र

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर 'क्रीडा ई-प्रमाण'प्रणाली कार्यान्वित*;*खेळाडूंना मिळणार आता घरबसल्या  क्रीडा ई-प्रमाणपत्र
पुणे : राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळण्याकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता 'क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही, तसेच ज्या खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहे, त्यांनी तात्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त करून घ्यावे. 

ब्लॉकचेन तंत्रज्ञान ही प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करता येत नाही. ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल. खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि मूळ डेटाशी ती जुळल्यास, अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय क्युआर कोड असल्यामुळे संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांना प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळणी करता येणार आहे. 

ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली आहे, त्यांनी यापुढे शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास, या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करुन घेणे आवश्यक आहे.

या प्रणालीअंतर्गत ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख 'क्रीडा ई-प्रमाण पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात येत आहेत. या अभिलेखाद्वारे खेळाडू आपले ५ टक्के खेळाडू प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊ शकतात, यासाठी खेळाडूंनी संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य राहील.  या संकेतस्थळावर सर्वात खाली आमच्या सेवा मध्ये ५ टक्के रिर्झवेशन या टॅबमध्ये एक वेळ नोंदणी पूर्ण करावी. या नोंदणीकरिता, वैयक्तिक माहिती व 'क्रीडा ई-प्रमाण' संकेतस्थळावर  अर्ज करतांना खेळाडूनी आपल्या आधार-संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकाचा आणि ओळखपत्र, ई-मेल पत्ता,  आधार कार्ड पीडीएफ स्वरुपात,  क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्रावीण्य प्रमाणपत्र सोबत ठेवावे. 

स्पर्धेचे अभिलेख उपलब्ध नसल्यास 'Grievance' द्वारे अर्ज  करावे. ज्या खेळाडूंची माहिती अभिलेखात किंवा प्रमाणपत्रे तांत्रिक कारणास्तव प्रणालीवर दिसत नसतील, तर support@kridaepramaan.org या ई-मेलवर आपली तक्रार आपल्याकडे असलेल्या क्रीडा प्रमाणपत्रासह नोंदवावी, खेळाडूंनी आपले निवेदन सादर करताना  सहभागी स्पर्धेचे अचूक नाव व वर्ष नमूद करावे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मूळ क्रीडा प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत निवेदनासोबत जोडावी. अशा स्वरुपात अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभाग स्तरावर त्या माहितीची शहानिशा करून हे अभिलेख संकेतस्थळावर अद्ययावत करण्याची कार्यवाही केली जाईल.

अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अन्य खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याबाबतची माहिती त्वरित  संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५ ची स्पर्धा), ज्युडो (२०२४ ची स्पर्धा), कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) ह्या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्याच खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. इतर पात्र खेळांच्या खेळाडूंनी नोंदणी करावी, इतर अभिलेख देखील अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे, असेही क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test