आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे
कालकथित लक्ष्मीबाई शंकर धिवार यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा.
सासवड (प्रतिनिधी ) राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचे मूळ गाव खानवडी येथील रहिवासी आणि बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांच्या मातोश्री कालकथित लक्ष्मीबाई शंकर धिवार यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन राष्ट्रीय समाज प्रबोधन कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या समाज प्रबोधन रुपी किर्तन सेवेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्मातील सूत्तपठणाचा विधी पार पाडण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याला राष्ट्रीय समाज प्रबोधनकार ह.भ.प .ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापुरुषांच्या घोषणांचा जय घोष करण्यात आला. महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच कालकथित लक्ष्मीबाई शंकर धिवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण,पंचशील हा विधी घेण्यात आला.सर्व उपस्थितांना धम्मदेसना देण्यात आली. बौद्ध विधीनुसार अभिवादन कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी कालकथित लक्ष्मीबाई शंकर धिवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे नेते विष्णू दादा भोसले होते. यावेळी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या वतीने बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांच्या मातोश्री कालकथित लक्ष्मीबाई यांचा जीवनपट आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेवटची आदरांजली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माणिकराव झेंडे पाटील यांनी वाहिली. या मातेचा जीवनपट आणि तिच्या आठवणी सांगत असताना अनेक मान्यवरांनी सांगितले की या मातेच्या संस्कारामुळेच सुनील तात्या धिवारांसारखा पुत्र आज समाजात गोरगरीब जनतेची सेवा करताना दिसत आहे. या मातेच्या शिकवणी मुळेच हे कुटुंब आदर्श कुटुंब म्हणून समाजात नावारूपाला आलेले आहे.अध्यक्षीय भाषणात रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे नेते विष्णू दादा भोसले म्हणाले की ही माता अशिक्षित होती का सुशिक्षित होती हे महत्त्वाचे नव्हते तर ती एक आदर्श संस्कारक्षम माता होती.म्हणूनच सुनिल तात्या धिवार यांच्यासारखा आदर्श पुत्र बहुजन हक्क परिषदेच्या वतीने चांगले समाजकार्य करत आहे. आहे. धिवार कुटुंबाची संपूर्ण वाटचालच या मातेने दिलेल्या संस्कार वर चालू आहे.
यानंतर राष्ट्रीय समाज प्रबोधन कीर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे समाज प्रबोधन पर किर्तन झाले. या कीर्तनामध्ये त्यांनी समाजातील अनेक अनिष्ट चाली रूढी परंपरा, अंधश्रद्धा यावर त्यांनी प्रबोधन केले. वारकरी पंथ हा बुद्ध धम्माचीच परंपरा आहे. बुद्ध धम्मातील त्रिशरण आणि पंचशीलाचे जर प्रामाणिकपणे आज कोण पालन करीत असेल तर तो पंथ आहे वारकरी पंथ. आपल्या समाज प्रबोधनरुपी किर्तन सेवेतून प्रबोधन करताना ते म्हणाले की आईचा गर्भ हा मुलांच्या संस्काराचे पहिले विद्यापीठ आहे. त्यामुळे मूल हे गर्भात असताना आईने महापुरुषांचे विचार ऐकले पाहिजेत, पुस्तके वाचली पाहिजेत. राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना जास्त प्रेरणादायी पुस्तके वाचली म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करता आले. आजच्या महिला मूल गर्भावस्थेत असताना टीव्ही सिरीयल मधील नको त्या मालिका बघतात आणि तेच संस्कार गर्भातील मुलावर होतात. परिणामी मूल जन्माला आल्यानंतर चुकीच्या मार्गावर जाते याला कारण तुम्ही गर्भावस्थेत काय करता यावर मुलाचे भविष्य अवलंबून असते. कारण मुलाची नाळ ही मातेच्या उदराशी जोडलेले असते. माता जसे विचार करेल तसेच मुल घडत असते. म्हणून मुल गर्भअवस्थेत असताना चांगली संस्कारक्षम , प्रेरणादायी आणि महापुरुषांचे विचारांची पुस्तके वाचा म्हणजे पुढची पिढी चांगली घडेल. तरुणांना संदेश देत असताना त्यांनी सांगितले की व्यसनांपासून दूर राहा. माणसाने माणसाशी भेदाभेद न करता माणसासारखे वागा. हा जन्म पुन्हा नाही. यावेळी त्यांनी वेदातील अनिष्ट प्रथांवरही प्रहार केला. संतांचे विचार हे बुद्धांचेच विचार आहेत असेही त्यांनी ठणकावून सागितले.कीर्तन हे विचारपीठ सत्य सांगण्याचे आहे. बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांच्या विषयी समाज प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे कीर्तनामध्ये सांगताना म्हणाले की मुलगा कसा असावा तर सुनिल तात्या सारखा असावा.आईची सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुनील तात्या. कोरोनाची आठवण सांगत असताना ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे म्हणाले की सुनील तात्या धिवार यांच्या मुलीला कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाची लागण झाली तर त्यांनी मुलगी दीक्षा हिला कोरोनटाइन केले.वेगळ्या खोलीत ठेवले.आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे कोरोनाचे टेस्ट करणे त्यावेळेस बंधनकारक असायचे. घरातील स्वतःची,मुलाची, पत्नीची आणि आईची कोरोनाचे टेस्ट करून घेतली आणि त्यामध्ये ही माऊली लक्ष्मी आई हिची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. सुनिल तात्यांनी जेव्हा आईला कोरोनाचे लागण झाली असे समजले तेव्हा त्यांनी आईला वेगळे न ठेवता कॉरंटाईन न करता आईला घरातच सगळ्यांच्या समवेत ठेवलं. घरातील सगळ्यांना सांगितलं आईला आपण वेगळं ठेवायचं नाही आईबरोबर आपण सगळेच एकत्र राहू.तिला कळू द्यायचं नाही की तिला कोरोना झाला आहे म्हणून. नाहीतर ती घाबरूनच तिचं काहीतरी बरं वाईट होईल. काहीही झालं तरी तिला आपल्यापासून वेगळं ठेवायचं नाही एक वेळ आपण सगळे एकत्र मरू पण मी माझ्या आईला वेगळं ठेवायचं नाही.आजच्या काळात केवढी ही मातृभक्ती.स्वतःच्या जीवाची आणि बायका मुलांच्या पेक्षा आईवर जीव लावणारा हा सुनील तात्या एक आदर्श पुत्र आहे. धन्य ती माऊली आणि धन्य तिची कुस. ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे महाराज यांचे सत्कार बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांच्या हस्ते शाल देऊन करण्यात आले.यावेळी छत्रपती संभाजीनगर वरून खास पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी आलेले गाथा चिंतन ट्रस्टचे ह.भ. प. डॉक्टर बालाजी जाधव यांच्या वतीने ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांना श्री संत तुकाराम महाराजांचा सार्थ नीतीबोध गाथा व संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. ह.भ.प. डॉक्टर बालाजी महाराज जाधव यांचा सत्कार बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांच्या हस्ते शाल घालून करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता बौद्ध धम्मातील धम्मपालन गाथा घेऊन करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीने कालकथित लक्ष्मीबाई शंकर
धिवार यांना सामुदायिक अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. तसेच सुनिल तात्या धिवार यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट,नातेवाईक,सगेसोयरे, मित्रपरिवार, जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सर्व आजी माजी सदस्य ,बहुजन हक्क परिषदेतील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,पत्रकार बंधू,पुरंदर तालुका पत्रकार संघाचे सदस्य,विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,
मित्रपरिवार तसेच खानवडी व पंचक्रोशीतील सर्व आजीमाजी ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी सुनील तात्या धिवार यांच्या कुटुंबीयांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार बहुजन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांनी मानले.



