महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ पुरस्कारात बारामती तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
बारामती : बारामती तालुक्यातील कोह्राळे बुद्रुक येथील “श्री स्वामी समर्थ तरुण मंडळ” यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२५ च्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
या पुरस्कारामध्ये रोख रक्कम २५ हजार रुपये व प्रशस्तीपत्राचा समावेश असून गुरुवार, ता. १४ मे २०२६ रोजी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सांस्कृतिक भवन येथे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते मंडळाचा सन्मान करण्यात आला.
सन १९९८ मध्ये कोह्राळे बुद्रुक येथे या मंडळाची स्थापना झाली असून २००२ मध्ये धर्मादाय आयुक्त, पुणे येथे मंडळाची अधिकृत नोंदणी करण्यात आली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गावडे (पंत) असून सचिव म्हणून श्री. राकेश जोशी कार्यरत आहेत. विद्यमान अध्यक्ष प्रकाश गावडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे कार्य सुरू आहे. गावातील सर्व जाती-धर्मातील १८ तरुण सभासदांच्या सहभागातून गेली २५ वर्षे मंडळ पारंपरिक व सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव साजरा करीत आहे.मंडळाने २००७ मध्ये लोकवर्गणी व संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गावडे यांच्या स्वनिधीतून सुमारे पाच लाख रुपये खर्च करून भव्य व देखणे श्री गणेश मंदिर उभारले. मंदिरात दररोज पूजा-अर्चा, आरती व प्रसादाचे नियोजन गावडे परिवाराकडून नियमित केले जाते. त्याच वर्षी गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर संत-महंतांच्या उपस्थितीत तसेच पोलीस अधिकारी मा. विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक व लोकजागृतीपर उपक्रम राबविले जातात. मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्नदान, दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय स्पर्धांना बक्षिसे, व्यसनमुक्ती अभियान, वृक्षारोपण, वारकरी सेवा, पालखी सोहळ्यांमध्ये अन्नदान तसेच विविध संतांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात मंडळ अग्रेसर आहे.
याशिवाय गेल्या सात वर्षांपासून विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्ररोग निदान शिबिरातून पंचक्रोशीतील हजारो रुग्णांना लाभ मिळाला आहे. धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि सेवाभावी कार्य यामुळे मंडळाने तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मंडळाच्या सातत्यपूर्ण सेवाकार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने बारामती तालुक्यातील एकमेव मंडळ म्हणून “उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ २०२५” हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला आहे. संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गावडे (पंत), सचिव राकेश जोशी, अध्यक्ष प्रकाश गावडे तसेच सर्व कार्यकारी मंडळ सदस्य व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



