सोमेश्वरनगर वाघळवाडी येथील मृणाली चव्हाण-जाधव यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान
सोमेश्वरनगर - पुणे येथील म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयात डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये संशोधक म्हणून काम करत असणाऱ्या मृणाली भानुदास चव्हाण यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 'इलेक्ट्रॉनिक सायन्स' या विषयामध्ये पी.एचडी. प्रदान करण्यात आली. त्यांनी "Design and Development of an Electronic System for the Detection of Pesticide Residue on Edible Fruits" डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टीम फॉर द डिटेक्शन ऑफ पेस्टिसाइड रेसिड्यू ऑन एडीबल फ्रुट्स) या विषयावर संशोधन केले आहे.
या संशोधनावर त्यांचे सायंटिफिक जर्नल्स मध्ये शोधनिबंध प्रकाशित झाले असुन पेटंट देखील ग्रँट झाले आहे. त्यांना डॉ. दीपा रमाने उपप्राचार्या, सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स पुणे , इमरिटस प्रा. डॉ. अरविंद शाळीग्राम (सीईओ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रिसर्च पार्क फाउंडेशन व डॉ. तुकाराम डोंगळे सहा. प्रा. स्कूल ऑफ नॅनो सायन्स अॅण्ड बायोटेक्नोलॉजी, शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापुर यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच डाॅ. रजनीश कामत कुलगुरू, डाॅ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले.
मृणाली या ऑक्टोबर २०१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये सेट (SET) परीक्षा तसेच २०२१ मध्ये यूजीसी नेट NET परीक्षा देखील उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. साठीची प्रवेश प्रक्रिया (पेट) उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची संशोधक विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली होती.
मृणाली या फक्त दोन वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आईने केला. त्या सांगतात की, 'माझी आई नेहमी म्हणायची खूप शिक.' त्यांना खरंतर इंजिनिअरिंगची आवड होती. परंतु परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी बी.एससी. ला एडमिशन घेतले. एम् .एससी. साठी त्यांना पुणे विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ येथे दोन्ही विद्यापीठांमध्ये मेरिट लिस्टमध्ये नंबर लागला होता. परंतु पुण्यातला खर्च झेपणार नाही म्हणून शिवाजी विद्यापीठात ऍडमिशन घेतले तेही फक्त मेरिट लिस्ट मुळे सोळाशे रुपये मध्ये झाले. एम्. एससी. पूर्ण झाल्यानंतर पुढे लगेच पी.एचडी. करायची इच्छा होती. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे घरच्यांनी लग्नाचा विचार केला. २०१३ मध्ये बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील नामदेव जाधव यांच्याशी विवाह ठरला. परंतु लग्नानंतर सासरची देखील परिस्थिती नाजूकच असल्याने सोमेश्वर सायन्स कॉलेज येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. परंतु शिकण्याची इच्छा असल्याने व सह-जोडीदाराची सुद्धा खंबीर साथ लाभल्याने पंखांना नवीन बळ मिळाले आणि त्यामुळे मृणाली मंगल भानुदास चव्हाण ते डॉ. मृणाली नामदेव जाधव हा प्रवास शक्य झाला. नोकरी, शिक्षण, संसार, अभ्यास, संशोधन अशा सगळ्या आघाड्यांवर काम करून दोघांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. संशोधनाला पैसा अधिक लागतो. त्यामुळे लग्नानंतर सुद्धा त्यांनी साध्याच राहणीमानाला प्राध्यान्य देत इतर गोष्टींमधे गुंतवणूक/खर्च न करता त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. शिक्षण हेच खरं सोनं मानून शिक्षणातच गुंतवणूक केली. या सर्व यशामध्ये त्यांची मुलगी राजवर्धिनी हिने देखील खुप संयम दाखविला. घरच्यांची साथ मिळाली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मिळवलेल्या यशामुळे सोमेश्वर परिसरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.



