सोमेश्वरनगर - पुणे ग्रामीणच्या माळेगाव पोलीस स्टेशनने एक मोहीम राबवून जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांवर मोठा प्रहार केला आहे. माळेगाव पोलीस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि धारदार कुकरी जप्त करून दोन आरोपींना तत्काळ अटक केली आहे.
माळेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ८ जून २०२६ रोजी रात्री माळेगाव-कहावगज रोडवर पोलीस गस्त घालत होते. यावेळी पोलिसांचे लक्ष ‘एमएच-४२-एएक्स ४४२८’ या ‘निओस ग्रँड’ गाडीकडे गेले. पोलीस पथकाने गाडी अडवून त्यातील इसमाची झडती घेतली. त्याचे नाव गणेश तात्याराम गावडे (वय २०, रा. क-हावगज) असे समोर आले. त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस आढळले. तसेच, गाडीच्या ड्रायव्हर सीटखाली एक धारदार कुकरी चाकूही मिळून आला.
पोलीस पथकाने गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस.,कुकरीह्युंदाई निओस ग्रँड गाडी असा एकूण ३,३०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेश गावडे याने हे हत्यार मयूर विष्णू मोरे (रा. मेढद) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. त्याला ही हत्यारे कशासाठी हवी होती आणि आणखी कोणाला ही हत्यारे पुरवली होती का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये विविध अधिनियम कलमअन्वये गुन्हा दाखल करून गणेश गावडे आणि मयूर मोरे यांना अटक केली आहे.सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उप-विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. माळेगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि. कुलदीप संकपाळ, देविदास साळवे, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर सानप, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे आणि जयसिंग कचरे यांच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.



