यंदा दिवाळीची सुरवात १२ नोव्हेंबरपासून होणार आहे. दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी गाय आणि वासरु यांची सवत्स पूजा करुन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसंच याशिवाय याच दिवसापासून दिव्यांची आरस केली जाते. त्यामुळे याच दिवसापासून दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. यंदा दिवाळीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे हा सण साजरा करता येणार नाही. पण आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात आपण वसुबारसच्या शुभेच्छा मात्र नक्कीच देऊ शकता.
कृषी संस्कृतीशी नाते सांगणारी वसुबारस पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन वेगवेगळ्या सणांच्या रूपाने केले जाते. ह्यात पशू, पक्षी, वृक्ष यांना मोठे महत्व आहे. वसुबारस हा त्याचाच भाग आहे.
दरवर्षी दिवाळीचा एक वेगळाच उत्साह सर्वत्र लोकांमध्ये दिसून येतो. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी साजरी करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. तसंच फटके देखील न फोडण्याचं आवाहन ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी साधेपणाने साजरा करावी लागणार आहे