बारामती शहरातील प्रकार
बारामती- बारामती शहरातील भिगवण रोड लगत असणाऱ्या श्रीरामनगर येथील महिलेच्या गळ्यातील दिवसाढवळ्या सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. शहरातील रहदारीच्या रस्त्यावर ऐन दिवाळीत असा प्रकार घडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सदर घटना काल दि.१५ रोजी घडली.शहरातील श्रीरामनगर येथे दत्तात्रय पवार यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या घराशेजारीच हा व्यवसाय करतात. पवार हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. पवार दुकानात नाहीत हे हेरून अज्ञात चोरट्यांनी दुकानात येत आमचे कपडे तुमच्या दुकानात आहेत. असे सांगितले, तेव्हा पवार यांच्या पत्नी लॉन्ड्रीचे कपडे शोधत असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधून गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेत मोटरसायकलवरून पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर पवार यांच्या पत्नीने आरडाओरड केली. हा गोंधळ ऐकून एका फूल विक्रेत्या व्यक्तीने मोटरसायकल वरून पळून जात असलेल्या चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना चोरट्याने चाकूचा धाक दाखवून ते तेथून पसार झाले.
मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे लॉन्ड्री चालकाच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. सदरचा तपास सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.